There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
सुधीर फरगडे यांच्या SMART Time Management कोर्स मधून साभार...
Tue Jul 12, 2022
आपल्या जीवनात करण्याजोग्या अनेक गोष्टी आहेत. आणि जर आपण तेथे पूर्ण लक्ष दिले तर आपली प्रभावकारिता अनेक पटींनी वाढू शकते. वैयक्तिक जीवनात मी फारच प्रवास करणारा किंवा प्रत्येक वेळी सर्व सामाजिक कार्यात सहभागी होणारा व्यक्ती नाही. पण करियर कौन्सिलर व लाईफ कोच म्हणून जेथे जेथे माझी गरज असेल अशा कार्यक्रमांत व उपक्रमांत उपस्थित राहायला आणि लोकांच्या आयुष्यात सकारात्मक योगदान द्यायला मात्र मला मनापासून आवडते.
रोज सकाळी ध्यान करणे... व्यायाम करणे, पुस्तक वाचणे, नवनवीन गोष्टी शिकणे आणि परिवारासोबत काही क्षण आनंदाने व्यतीत करणे या माझ्या नेहमीच्या सवयी आहेत. आणि यामुळे दिवसभर काम करण्यासाठी जी उर्जा आणि उत्साह मिळतो त्यामुळे माझी कार्यक्षमता अधिक वाढते. परंतु हे सर्व आपणही करावे आणि त्यासाठी जबरदस्तीने पहाटे उठून या सगळ्या गोष्टी सुरु कराव्यात असा देखील माझा आग्रह नाही. आयुष्य जर अधिक यशस्वी व आनंदी जगायचे असेल तर प्रचंड शारीरिक, मानसिक मेहनत करण्यापेक्षा उपलब्ध वेळेचा अधिक हुशारीने वापर करून कमी वेळात अधिक काम करावे आणि आपली क्रियाशीलता वाढवावी असे माझे मत आहे.
आणि हे साध्य करण्यासाठी या ब्लॉगमध्ये सांगत असलेल्या सवयी नक्की तुमच्या आयुष्यात निर्माण करा. पण त्यासाठी तुम्हाला हि पोस्ट पूर्ण वाचावी लागेल...
"आपल्या आजच्या दिवसाचा शेवट हा उद्याच्या दिवसाची सुरुवात असला पाहिजे हे माझं आग्रही मत आहे."
अनेकदा आपण सकाळी उठतो तेंव्हा आज कोणकोणत्या महत्वाच्या गोष्टी करायच्या आहेत हेच आपल्याला माहिती नसते. नेहमीच्या सवयीने दिवसभर जे पुढे येईल ते काम आपण करत राहतो आणि अशातच एक अमुल्य दिवस आपल्या आयुष्यातून निघून जातो. रात्री निवांत झाल्यावर आज आपल्याकडून करायचे राहून गेलेल्या कामांची यादी फेर धरून नाचू लागते. आणि इतके महत्वाचे काम आपण कसे विसरलो आणि आजचा दिवस कसा वाया गेला असे म्हणत स्वत:वरच चरफडत आपण झोपी जातो. विद्यार्थी महत्वाचा अभ्यास करायचाच विसरून जातात... व्यावसायिक एखादी महत्वाची मिटिंग किंवा व्यवसायाच्या नियोजनासंदर्भातील अत्यंत महत्वाची गोष्ट विसरून जातात... तर नोकरी करणाऱ्याना देखील त्यांच्या काही महत्वाच्या कामांच्या बाबत विसर पडलेला असतो. आणि या सगळ्याच्या मुळाशी आपल्याला आपल्याच कामांची स्पष्टता नसणे हे प्रमुख कारण असते.
आणि गंमतीची गोष्ट माहिती आहे का? हि स्पष्टता आणणे खुप खुप सोपे आहे. मी माझ्या स्मार्ट टाईम मॅनेजमेंटच्या कार्यशाळेत माझी एक छोटीशी सवय असलेली एक महत्वपूर्ण टेक्निक शेअर करतो. आणि ती म्हणजे मी नेहमी दुसऱ्या दिवसाची अत्यंत महत्वाची ३-४ कामे आदल्या रात्रीच लिहून ठेवतो. रात्री जेंव्हा आपण गाढ झोपी जातो तेंव्हा देखील आपला मेंदू सक्रीय असतो. आणि रात्री झोपण्यापूर्वी आपल्या मनात जे तीव्र विचार असतात त्यावर आपला मेंदू रात्रभर अधिक जास्त लक्ष देतो व त्यासाठीचे न्यूरल पाथ वे निर्माण करायला सुरुवात करतो आणि परिणामी दुसऱ्या दिवशी हि अत्यंत महत्वाची कामे आपल्याकडून न विसरता सहजपणे पूर्ण केली जातात.
आणि म्हणूनच आपल्या आजच्या दिवसाचा शेवट हा उद्याच्या दिवसाची सुरुवात असला पाहिजे हे माझं आग्रही मत आहे.
म्हणून आजपासून झोपण्यापूर्वी एक वही / डायरी व पेन घ्या आणि तुमची उद्याची महत्वाची ३-४ कामे लिहून काढा. आणि काही क्षण डोळे बंद करून प्रत्येक काम पूर्ण झाल्यावर तुम्हाला काय वाटेल किंवा काय फायदा होईल याचा तीव्रतेने आणि स्पष्टपणे विचार करा. ते विचार तुमच्या अंतर्मनात झिरपू द्या.
"वेळ विकत घेता येत नाही पण उपलब्ध वेळेत अधिक सहजतेने काम करून आपण तो वाचवू जरूर शकतो."
जेथे आपण काम करतो... किंवा अभ्यास करतो ती आपली खोली / कार्यालय आणि तेथील आपला टेबल स्वच्छ व नीटनेटका ठेवा. ज्या विषयाचा अभ्यास करायचं आहे त्याचीच पुस्तके / वह्या तेथे ठेवा किंवा जे काम आता करायचे आहेत त्याच्याशी सबंधित फाईल्सच तुमच्या टेबलवर असू द्या. इतर सगळ्या गोष्टी ज्यांची त्या कामात किंवा अभ्यासात गरज नाही त्या त्यांच्या नेहमीच्या जागी व्यवस्थित ठेवून द्या. तुमची वह्या-पुस्तके, डायरीज, फाईल्स आणि कागद व्यवस्थित जुळवून ठेवा. त्यामुळे पुढील वेळी त्या गोष्टी शोधण्याचा तुमचा अमुल्य वेळ नक्कीच वाचेल.
एक साधी सोपी सवय तुम्ही स्वत:ला लावून घेवू शकता आणि ती म्हणजे सकाळी उठल्यावर लगेचच तुमचा बेड आवरून घ्या. कपडे घड्या करून ठेवून द्या आणि बेडशीट, उश्या व्यवस्थित करून ठेवा. सुरुवातीला हे सगळं ठरवून करावा लागेल पण रोज आठवणीने हे करत राहिला तर त्याचे सवयीत रुपांतर होईल. आणि नंतर तुम्ही आपसूकपणे ते काम करायला लागाल. यामुळे मेंदूला एक काम पूर्ण केल्याचा संदेश जातो आणि त्यामुळे आपला उत्साह वाढतो व पुढील कामे देखील आपण पूर्ण होणार या आत्मविश्वासाने करायला लागतो. आणि हो तुमच्या घरातील मुलांना देखील हि सवय लावा.
नेहमी लक्षात असू द्या कि एखादे काम सवयीचे होईपर्यंत त्याच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे लागते. कामाची चालढकल, कंटाळा, थकवा अशा नकारात्मक बाबींना बाजूला ठेवून ते काम करण्यासाठी स्वत:ला प्रवृत्त करणे गरजेचे असते. पण एकदा का त्या कामाचे सवयीत रुपांतर झाले कि सहजपणे न जाणवता त्या गोष्टी पूर्ण करायला लागाल. पूर्वी शोधाशोध, गोंधळ यात जाणारा वेळ आता तुम्हाला अभ्यासासाठी आणि कामासाठी वापरता येईल. वेळ विकत घेता येत नाही पण उपलब्ध वेळेत अधिक सहजतेने काम करून आपण तो वाचवू जरूर शकतो.
गोष्टी अधिकाधिक सोप्या करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपण कामात अधिक लक्ष केंद्रित करू शकू.
आपण जाणते-अजाणतेपणी सहज सोप्या गोष्टी अवघड करून ठेवतो. त्यामुळे वारंवार आपले लक्ष पूर्णत: कामात केंद्रित न होता अन्य बाबींकडे वेधले जात राहते. यासाठी गोष्टी अधिकाधिक सोप्या करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपण कामात अधिक लक्ष केंद्रित करू शकू. खालील काही तंत्रे तुम्हाला यासाठी निश्चित मदत करतील.
संपूर्ण शक्ती / उर्जा कामावर केंद्रित करा
जेंव्हा तुम्ही महत्वाच्या कामात असता किंवा तुमचा अभ्यास करत असता तेंव्हा तुमचे लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी बाजूला ठेवा. जर तुम्ही घरात असाल तर तुमचे पाळीव प्राणी तुमचे लक्ष वेधून घेवू शकतात आणि तुम्हाला कामापासून विचलित करू शकतात. मोबाईल किंवा कम्प्युटरवर येणारे व्हाटसअप, ईमेल किंवा इतर प्रकारचे नोटिफिकेशन बंद करून ठेवा. अगदी शक्य असल्यास काम पूर्ण होईपर्यंत मोबाईल फ्लाईट मोडवर देखील ठेवू शकता. यामुळे तुम्ही अधिक एकाग्रपणे आणि पूर्ण क्षमतेने तुमचे काम करू शकता.
स्वत:ला कामाच्या प्रवाहात आणा
अनेकदा आपण इतर विचारात गुरफटून गेलेलो असतो आणि अचानक पुढील काम करायला घेतो. अशा वेळी आपल्या मनात अजून आधीच्याच कामाची साखळी सुरु असते आणि त्यामुळे नवीन सुरु केलेले काम आपण पूर्ण क्षमतेने करू शकत नाही. विद्यार्थ्याच्या बाबत तर हा प्रकार रोज घडत असतो. एका विषयाचा अभ्यास संपवून लगेच दुसऱ्या विषयाचा अभ्यास सुरु करताना हा अनुभव अनेक विद्यार्थ्यांना येत असतो.
यासाठी काही क्षण डोळे बंद करून शांत बसा... काही दीर्घ श्वास घ्या... किंवा जागेवर करता येवू शकतील असे साधे सोपे व्यायाम दोन ते पाच मिनिटे करा. यामुळे आधीचे काम किंवा विचारांची साखळी खंडित होवून नवीन कामात संपूर्ण लक्ष देणे शक्य होईल.
आपण जेंव्हा ठरवलेले काम पूर्ण करतो तेंव्हा होणारा आनंद आगळा-वेगळा असतो. आणि जर ठरवलेले काम निश्चित वेळेच्या आत पूर्ण झाले तर आपल्या मनात निर्माण होणाऱ्या सकारात्मक विचार लहरी आपल्याला अधिक उर्जा, आनंद आणि स्वत:च्या आयुष्यावर नियंत्रण मिळवून देण्याचे काम करतात.
टाईम मॅनेजमेंट ही अत्यंत महत्वाची पण बऱ्याचदा सहजपने दुर्लक्षित केली जाणारी गोष्ट आहे. तुम्हाला तुमच्या वेळेवर... आयुष्यावर आणि यशावर नियंत्रण मिळवायचे असेल तर तुमच्या वेळेचे मालक बना... आणि यासाठी परिपूर्ण मार्गदर्शन आणि जगभरातील यशस्वी लोकांकडून वापरली जाणारी शास्रीय तंत्रे शिकायची असतील तर आपल्या स्मार्ट टाईम मॅनेजमेंटच्या कार्यशाळेत नक्की सहभागी व्हा.
तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते खाली कमेंट बॉक्स मध्ये आठवणीने टाईप करा. धन्यवाद!