तुम्हाला जीवनातील ताणतणावातून मुक्त व्हायचंय का? मग हे वाचाच...

कृतज्ञतेकडून तणावमुक्त आनंदी जीवनाकडे...

Mon Jul 18, 2022

कृतज्ञता / Gratitude

आव्हाने आणि वेगवान बदलांनी भरलेल्या धावपळीच्या आयुष्यात, स्पर्धेच्या जगात आणि आत्मकेंद्रित जीवनशैलीत अपरिहार्यपणे निर्माण होणारी एक मानसिक अवस्था म्हणजे ताणतणाव.

दाहक वास्तव

ताणतणाव का, कुणाला, कधी आणि कुठे येतो हे वेगळे सांगण्याची गरजच उरलेली नाही. अगदी विद्यार्थी जीवनापासून ते वयोवृध्द व्यक्तींपर्यंत प्रत्येक जण ताणतणावांचा अनुभव घेत असतो. अभ्यासाचा... परीक्षेचा... पालकांच्या अपेक्षांचा ताणतणाव विद्यार्थ्यांना सातत्याने जाणवतो... आणि कधी कधी तो त्यांना अगदी आत्महत्येच्या निर्णयापर्यंत घेवून जातो अथवा मानसिकरित्या दुर्बल बनवून टाकतो. तुम्हाला हे वाचून धक्का बसेल की National Crime Records Bureau (NCRB) च्या २०२०च्या अहवालानुसार भारतात एकूण आत्महत्येपैकी ८.२% म्हणजे १२,५२६ आत्महत्या फक्त विद्यार्थ्यांच्या आहेत. आणि चिंतेची दुसरी गोष्ट म्हणजे फक्त महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे १६४८ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी आत्महत्येच्या २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये २८७% वाढ झालेली आहे. 

कार्यालयीन राजकारण, वरिष्ठांकडून सातत्याने होणारा छळ, कामाच्या डेडलाईन, कामाचा अतिरिक्त भार, मिळणारा पगार आणि करावे लागणारे काम यातील प्रचंड तफावत, तसेच कामाच्या अतिरिक्त दबावातून कुटुंबाला आणि स्वत:ला देखील पुरेसा वेळ देता न येणे यामुळे नोकरी करणारे शासकीय अथवा खाजगी क्षेत्रातील कामगार सातत्याने ताणतणावांचे शिकार होतात. यातून विविध शारीरिक व्याधींचे शिकार होणारे सर्वाधिक लोक नोकरीतील पाहायला मिळतील. अगदी तरुणवयात देखील हृदयविकाराचे शिकार झालेले युवा नोकरदार पाहायला मिळतात. हृद्य विकार जास्त येण्याचे प्रमाण सोमवारी सर्वाधिक आढळते असा आश्चर्यकारक निष्कर्ष एका संशोधनातून पुढे आलेला आहे. सतत सात वर्षे १,५६,००० हॉस्पिटलमधील माहितीचा अभ्यास करून हा निष्कर्ष संधोधकांनी काढलेला आहे. इतर दिवसांपेक्षा सोमवारी हे प्रमाण ११% जास्त असते आणि शनिवारी ते सर्वात कमी आढळते. जे काम जास्त तणाव निर्माण करते... जे काम करताना आनंद मिळत नाही तेच काम सातत्याने करत राहिल्याचा परिणाम येथे दिसून येतो. 

व्यवसाय करणारे सुखी म्हणावं तर त्यांना देखील सातत्याने व्यवसायातील अनियमितता छळत असते. व्यवसायातील वाढणारी स्पर्धा, नवीन व्यावसायिकांकडून होणारी गळेकापू स्पर्धा, गुंतवणूक आणि मिळणारा नफा यांच्यातील तफावत, व्यावसायिक कर्जे फेडताना होणारी दमछाक, कामगारांना सांभाळण्याची तारेवरची कसरत, स्वत:साठी एखादी सुट्टी देखील न घेता सातत्याने व्यवसायात व्यस्त राहणे इत्यादी असंख्य दृश्य अदृश्य कारणांमुळे व्यावसायिक देखील मोठ्या प्रमाणावर ताणतणावाचा सामना करावा लागतो. 

शेतकरी, गृहिणी, राजकारणी, सामाजिक क्षेत्रात काम करणारे लोक आणि जवळपास प्रत्येक क्षेत्रातील बहुसंख्य लोक आज ताणतणावानी ग्रस्त आहेत. कारणे निरनिराळी असतील... त्याच्यातून उद्भवणाऱ्या समस्यांची पातळीदेखील वेगवेगळी असेल, परंतु मूळ मात्र अनेकदा एकच सापडते आणि ते म्हणजे ताणतणाव. 

तुम्हाला देखील ताणतणावांचा सामना करावा लागतोय का? किंवा तुमच्या अवतीभवती, तुमचे कुटुंबीय किंवा मित्र यापैकी कुणी ताणतणावांमधून जात आहेत का? जर या दोन्हीपैकी कोणत्याही प्रश्नांचे उत्तर होकारार्थी असेल तर माझी विनंती आहे कि तुम्ही हा ब्लॉग पूर्ण वाचावा. कारण त्यामुळे एकतर तुम्ही व तुमचे कुटुंबीय तणावमुक्त जीवनशैली जगू शकाल किंवा तुमच्या आजूबाजूच्या इतर लोकांना आनंदी जीवन जगण्यासाठी तुम्ही प्रेरित करू शकाल... 

एक सार्वत्रिक गैरसमज आहे कि प्रश्न किंवा समस्या जेव्हडी अवघड तेव्हढे त्याचे उत्तर देखील अवघडच असते. पण वास्तव हे आहे कि कधी कधी अवघड समस्या अत्यंत साध्या-सोप्या पद्धतीने सोडविता येतात. अलीकडच्या काळात झालेल्या अनेक संशोधनामधून हे सिद्ध झाले आहे कि कृतज्ञतेच्या दैनंदिन सरावामुळे तणाव आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या दूर करता येवू शकतात.

कृतज्ञता म्हणजे काय?

हार्वर्ड मेडिकल स्कूलने केलेली कृतज्ञतेची व्याख्या मला खूप भावते. ते म्हणतात कि, “कृतज्ञता म्हणजे व्यक्तीला मूर्त किंवा अमूर्त स्वरूपात जे-जे प्राप्त झाले आहे त्याबद्दल आभारी राहणे. कृतज्ञता व्यक्त करण्यातून लोक त्यांच्या जीवनात घडणाऱ्या गोष्टीबद्दल व चांगुलपणाबद्दल कबुली देतात… आणि त्याच्या परिणामस्वरूप कृतज्ञता लोकांना स्वतःहून मोठ्या व्यक्तीशी, इतर लोकांशी, निसर्गाशी किंवा उच्च शक्तीशी जोडण्यास मदत करते.” 

१९९८ मध्ये ४५ प्रौढ लोकांवर McCraty and colleagues ने केलेल्या अभ्यासावरून असे दिसून आले कि कृतज्ञतेच्या सरावाने तणाव निर्माण करणारे हार्मोन्स २३% कमी झाले. 

अनेकदा लोक जीवनात जे मिळाले आहे त्याकडे लक्ष न देता जे मिळाले नाही त्याबद्दल कुरूकुर किंवा तक्रार करत राहतात व परिणामी ताणतणावाच्या विळख्यात सापडतात. म्हणून जेवढी जास्त कृतज्ञता आपण रोज व्यक्त करतो तेव्हडे जास्त आपण समाधानी, आनंदी, आशावादी व तणावमुक्त जीवन आपण जगायला सुरुवात करतो. आणि हे सत्य फक्त आज विज्ञानामुळेच सापडले आहे असे बिलकुल नाही, तर जगभरातील विविध धर्मांमध्ये याविषयी मोठ्या प्रमाणावर चर्चा केलेली दिसून येते. अनेक दृष्टांत, कथा यांच्या माध्यमातून धर्मग्रंथांमध्ये कृतज्ञतेविषयी वारंवार बोलतात. देशोदेशीचे विचारवंत, साधू-संत, तत्ववेत्ते देखील यावर सातत्यने चर्चा करतात. आणि आजचे प्रगत विज्ञान देखील याच मार्गावर जात त्याचे महत्व अधोरेखित करते आहे. 

तुम्हाला शेकडो वर्षापासून चालत आलेल्या या कृतज्ञतेच्या शक्तीचा अनुभव घ्यायचा असल्यास तुम्ही खालील व्हिडीओ आठवणीने बघा.

वरील व्हिडीओ पाहिला असल्यास आता कृतज्ञतेचे फायदे जरूर वाचा.

कृतज्ञतेचे फायदे

१. समाधानी जीवन: 

कृतज्ञतेचा सराव करणारे लोक अधिक समंजस, मोकळ्या मनाचे आणि कमी नकारात्मक विचारसरणीचे असतात. जीवनाबद्दल आशावादी दृष्टीकोन ते ठेवतात. काळजी, तणाव किंवा नैराश्य यापासून ते लवकरात लवकर स्वत:ची सुटका करून घेवू शकतात. मानसिक समस्यांमध्ये नैराश्य हि एक मोठी समस्या मानली जाते. आणि अनेक मनोविकारतज्ज्ञ यासाठी रुग्णाला कृतज्ञतेचा सराव करण्याचा सल्ला देतात. कृतज्ञतेचा सराव हा उपचाराचा (Therapy) भाग असावा असे तज्ज्ञांकडून सुचवले जाते. 

२. चांगले नातेसंबंध: 

जे लोक सातत्याने कृतज्ञतेचा सराव करतात ते इतरांना लवकर समजून घेतात तसेच ते इतरांना लवकर माफ देखील करतात असे संशोधनामधून आढळून आले आहे. (DeShea, 2003; Farwell & Wohlwend-Lloyd, 1998) यामुळे त्यांचे इतरांसोबतचे नातेसबंध अधिक सदृढ व सखोल बनते. 

 ३. मजबूत स्वनियंत्रण: 

जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात विविध प्रसंगांत आपल्याला स्वत:साठी अधिक उत्तम व उपयुक्त निवड करता येणे हे यशस्वी जीवनासाठी अत्यंत महत्वाचे कौशल्य आहे. आणि यासाठी स्वत:वरील नियंत्रण ठेवण्याची शक्ती अधिक सक्षमपने विकसित करणे गरजेचे असते. प्रा.ये.लि.( Professor Ye Li) यांच्या अभ्यासानुसार असे सिद्ध झाले आहे कि, "कृतज्ञतेच्या भावनेमुळे आत्म-नियंत्रण वाढू शकते आणि साध्या कृतज्ञतेच्या नियमित सरावाने अधीरता कमी करणे, नवीन मार्ग शोधून काढणे, मॉल्समध्ये खरेदीच्या वेळी अनावश्यक आवेग वा खरेदी करण्याची लालसा कमी करणे, लठ्ठपणा आणि धूम्रपान याबद्दल अधिक सजग होणे अशा विविध सामाजिक समस्या कमी करण्याचा मार्ग कृतज्ञतेच्या सरावामुळे खुला होतो." 

 ४. चांगले मानसिक व शारीरिक आरोग्य : 

२०१५ मधील एका संशोधनानुसार हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या ज्या रुग्णांनी कृतज्ञता सराव नियमितपाने पूर्ण केला त्यांच्यामधील जळजळ-सूज कमी झाली, झोप सुधारली आणि स्वभाव चांगला झाला; यामुळे केवळ ८ आठवड्यांनंतर त्यांच्या हृदयाच्या कमकुवतपणाची लक्षणे कमी झाली. 

मन व शरीर यांच्यामधील दुवा म्हणून कृतज्ञतेचा दुहेरी फायदा कसा होऊ शकतो हेच यातून सिद्द होते. 

आनंदी, आशावादी आणि तणावमुक्त जीवन जगण्यासाठी एक उपयुक्त माध्यम म्हणून आपण कृतज्ञतेच्या सरावाकडे पाहू शकतो. जर तुम्हाला स्वत:ला कृतज्ञतेचे अनुभव घ्यायचे असतील तर तुम्ही Sudhir Fargade हे शैक्षणिक Android App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करून घ्या आणि त्यात The Magical Life या २८ दिवसांच्या कृतज्ञता सराव कोर्सला रजिस्टर करा. 

जीवन अधिक आनंदी आणि समाधानी आणि निरोगी जगण्यासाठी व तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कृतज्ञता सराव कशी जादुई मदत करू शकते याचा प्रत्यक्ष अनुभव या २८ दिवसांच्या कृतज्ञता कार्यशाळेत घ्या. 

खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही लगेच रजिस्टर करू शकता. 

https://www.sudhirfargade.com/s/store/courses/description/The-Magical-Life

हा ब्लॉग संपूर्ण वाचल्याबद्दल आपले मन:पूर्वक आभार! तुम्हाला हि पोस्ट कशी वाटली ते खाली कमेंट मध्ये आठवणीने टाईप करा. किंवा कमीतकमी तीन वेळा Thank you असे लिहा... तुमचे प्रश्न / शंका यांना उत्तरे द्यायला मला मनापासून आवडते. म्हणून याबाबतच्या तुमच्या शंका आणि प्रश्नांचे मी स्वागत करतो.

Sudhir Fargade
Certified Career Counsellor, Life Coach & Motivational Speaker

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Sudhir Fargade 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy